निर्भीडसत्ता न्यूज –
अनेक गाजलेल्या सुरेल हिंदी गीतांची बरसात, सर्व ज्येष्ठ हास्ययोग कार्यकर्त्यांनी केलेले उत्स्फूर्त नृत्य यामुळे ’आज फिर जीने कि तमन्ना है’ हा गीतांचा कार्यक्रम गाजला.
निमित्त होते ’नवचैतन्य हास्ययोग परिवार’ च्या द्वी दशकपूर्ती कार्यक्रमाचे. या द्वी दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी मनीषा लताड, ‘गंधार एन्टरटेनमेंट्स’ आणि ‘महक’ प्रस्तुत ’आज फिर जीने कि तमन्ना है’ हा कार्यक्रम गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचा हास्ययोग कार्यकर्त्यांनी आनंद लुटला. ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार’च्या उपाध्यक्ष सुमन काटे यांनी मनीषा लताड यांचा सत्कार केला. यावेळी ’नवचैतन्य हास्ययोग परिवार’ चे अध्यक्ष विठ्ठल काटे आणि मान्यवर उपस्थित होते.
मनीषा लताड, गफार मोमीन, विवेक पांडे या गायक कलाकारांनी धमाल गाण्याच्या कार्यक्रमामध्ये ठेका धरायला लावणारी अनेक सुमधुर गाणी सादर केली. यामध्ये ‘आज फिर जिने कि तमन्ना है, ‘सत्यम शिवम सुंदरम’,’परदा है परदा’ आदी गाण्यांचा समावेश होता. आबाल वृद्धांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. गाण्याच्या तालात आपले वय विसरून धुंद होऊन नृत्य देखील केले. टाळ्यांच्या आणि शिट्यांच्या गजरात कार्यकर्त्यानी दाद दिल्याने सभागृहाचे वातावरण नादमय झाले होते. त्यामुळे हा गाण्याचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरला आणि हास्ययोगाच्या द्वी दशकपूर्तीला मनोरंजनाची सुरेल साथ मिळाली.
कार्यक्रमाची संकल्पना निश्चल लताड यांची होती. संदीप पंचवाडकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. तर संगीत संयोजन सईद बाबा खान यांचे होते.