निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवाचा रविवारी (दि.४) सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांच्या रंगतदार गायनाने समारोप झाला. पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत रविवारी(४ फेब्रुवारी) सध्याच्या पिढीचे लाडके गायक महेश काळे यांनी आपल्या रंगतदार गायनाने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले. मोठ्या संख्येने जमलेल्या रसिकांच्या मनावर महेशने आपल्या सुरांचे गारुड घालून त्यांना मंत्रमुग्ध केले. केवळ महेश काळे यांचे गायन ऐकण्यासाठी जमलेल्या लहानथोर सर्वच रसिकांना महेश यांनी आपल्यासह गायनात सामिल करुन घेऊन एक वेगळाच समा बांधला.
महेश यांनी आपल्या गायनाची सुरुवात शुद्धकल्याण रागातील ला दे ला दे सैंया चुनरिया कुसुम रंग की या बंदिशीने केली. त्यानंतर त्यांनी द्रुत लयीतील नींद न आवत आली मैं रचना सादर केली. त्यानंतर तराणा पेश केला. नंतर सादर केलेल्या घेई छंद या नाट्यगीताच्या गायनात उपस्थित रसिकांना सहभागी करुन त्यांना आपल्या साथीने गायला लावले. रसिकांनी देखील महेश यांच्या सुरात सूर मिळवून हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले. याच गाण्यात महेश यांच्या साथीला असलेल्या ड्रम, गिटार, पखवाज व तबलावादकांनी आपापली कला सादर करुन एक अप्रतिम फ्युजन सादर केले. आपल्या गायनाचा समारोप महेश यांनी सूर निरागस या सध्या प्रचंड लोकप्रिय असलेल्या गाण्याने केला. त्यांना यावेळी संवादिनीची साथ राजीव तांबे यांनी, तबलासाथ निखिल फाटक यांनी, पखवाजाची साथ प्रसाद जोशी यांनी, गिटारची साथ नितीन कुलकर्णी, ड्रमची साथ अभिजीत भदे व साईड रिदमची साथ सूर्यकांत सुर्वे यांनी केली.
या आधीच्या सत्रात गुरु गीता शर्मा यांच्या शिष्या मैथिली निसर्गी, ऋतुजा जोशी व श्रुती अय्यर यांचे सुंदर भरतनाट्यम नृत्य सादर झाले. तसेच गुरु वैशाली पळसुले-धोंगडे यांची शिष्या राजश्री धोंगडे हिचे कथ्थक नृत्य सादर झाले. अंबारी रेगे-नाईक व सानिया गोडबोले यांनी भरतनाट्य सादर केले. गुरु तेजश्री अडिगे यांच्या कलावर्धिनी नृत्यकला संस्थेच्या सुमारे तीस विद्यार्थिनीनी भरतनाट्यम नृत्य सादर केले. यात त्यांनी कीर्तनम, वर्णम, पदम, तिल्लाना व मंगलम यांच्या माध्यमातून मार्गम सादर केले. तंजावरचे सरफोजी राजे व शहाजी राजे भोसले यांच्या मराठीतील रचनांचा या कार्यक्रमात समावेश होता. पृथ्वीराज इंगळे याचे सुगम गायन सादर झाले. स्थानिक कलाकार सार्थक भोसले, बीना जैन, सतीश काळे, प्रशांत पवार, मिलाफ राणे यांचे गायन सादर झाले.
सकाळच्या सत्रात पिंपरी चिंचवड संगीत अकादमीतील विविध भागांमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. हा कार्यक्रम सायन्स पार्क येथील सभागृहात झाला. यात प्रणिता साळुंके हिने तीनताल सादर केला. तिला लेहरा साथ ओंकार रणधीर याने केली. नंतर प्रतीक्षा केदारे, वैष्णवी गलांडे, सानिका काटे यांनी संवादिनीवर राग बिहाग सादर केला. त्यांना तबलासाथ निखिल वाघमारे यानी केली. स्वतंत्र संवादिनी वादन सादर करताना प्रचिती शिरवले हिने राग सारंग सादर केला. तिला तबलासाथ प्रणिता साळुंके हिने केली. सुनील तोंडे यांनी राधा ही बावरी व किरण बेंदे यांनी घननीळा लडिवाळा ही गीते सादर केली. त्यांना तबलासाथ समर्थ पाथरकर यांनी केली. त्यांना समीर सूर्यवंशी, स्मिता देशमुख, उमेश पुरोहित, नंदीन सरीन, संतोष साळवे, विनोद सुतार, वैशाली जाधव या संगीत अकादमीतील गुरुंचे मार्गदर्शन लाभले होते.
या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक संजय नेवाळे, राहुल जाधव, लक्ष्मण सस्ते, भाजप प्रदेश महिला आघाडी चिटणीस उमा खापरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, नगरसेविका कमल घोलप, साधना मळेकर, शहर संघटक प्रमोद निसळ, सहायक आयुक्त दिलीप गावडे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी, सतीश इंगळे, सुनील पवार, सतीश वाघमारे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्वरसागर महोत्सवासाठी अण्णा बोदडे, प्रवीण घोडे, कडुस्कर, आडसूळ, रोकडे, शशिकांत मोरे, जरांडे, साळुंके, अप्पा पवार, ढेरंगे, केशव फुटाणे, गिरीश आवटे, स्वप्निल कंक, सचिन मोरे, संदीप क्षीरसागर, धोत्रे, गाजरे दत्तात्रय, खामकर, अकबर शेख, शिर्के, शेंडगे, गोंडवे, संगीत अकादमीमधील शिक्षक समीर सूर्यवंशी, स्मिता देशमुख, उमेश पुरोहित, नंदीन सरीन, संतोष साळवे, विनोद सुतार, वैशाली जाधव यांनी सहाय्य केले.