निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या एकुण १४ गावांचा समावेश करण्याचा विषय होता. त्यामध्ये महापालिकेच्या उत्तरेकडील आळंदी देवाची, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, देहू आणि विठ्ठलनगर या गावांचा, तर पश्चिमेकडील हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात अशा एकूण १४ गावांचा समावेश होता. मात्र, काही गावांनी पालिका हद्दीत समावेशाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे उत्तरेकडील सात गावे वगळून पश्चिमेकडील हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्याच्या प्रस्ताव पिंपरी महापालिका सर्वसाधारण सभेने १० फेब्रुवारी २०१५ रोजी मंजूर केला.
तसा प्रस्ताव ३ जून २०१५ राज्य शासनाला सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव शासनाने मंजूर करण्यास नकार दिला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्यामुळे ही गावे पालिका हद्दीत समावेश करण्याची आवश्यकता नसल्याची धारणा शासनाने मांडली होती. परंतु, हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे ही सात गावे आणि देहूगावातील विठ्ठलनगरपर्यंतचा भाग पालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. नगररचना विभागाने तसा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावाला महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुन्हा शासनाकडे सादर केला जाणार असून शासनाने मंजुरी दिल्यास ही गावे पालिकेत समाविष्ट होतील.