निर्भीडसत्ता न्यूज –
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटेंविरोधात शिवाजी नगर न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. एकबोटे यांना अटक करण्यासाठी खास पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील दलित बांधव गेले होते. त्यावेळी उसळलेल्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तसेच संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेचीही मागणी केली होती.
दरम्यान, कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेले मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.