निर्भीडसत्ता न्यूज –
जर्मन आणि स्टीलच्या भांड्यांनी भरलेला टेम्पो भांड्यासहित चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे गुरुवारी (दि. 17) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.
टुणटुण देवनारायण गुप्ता (वय 28, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता शहराच्या विविध भागात तीनचाकी टेम्पो घेऊन भांडी विक्रीचा व्यवसाय करतात. गुप्ता यांनी जर्मन व स्टीलची भांडी भरलेला टेम्पो (एम एच 14 / व्ही 8592) बुधवारी रात्री घरासमोर लावला होता. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी भांड्यांनी भरलेला टेम्पो चोरून नेला. गुरुवारी सकाळी आठ वाजता गुप्ता टेम्पो लावलेल्या ठिकाणी आले असता, टेम्पो गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.