निर्भीडसत्ता न्यूज –
हिंजवडीत आई आणि दहा महिन्याचा बाळाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधील रोख ५० हजार रुपये, मयत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र पतीच्या गळ्यातील सोन्याची चैन व दोन मोबाईल घेऊन पसार झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.९) रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील जांबे-नेरे मार्गावर घडली.
अश्विनी भोंडवे (वय २५) आणि मुलगा अनुज भोंडवे (वय ८ महिने, दोघे रा. दारुंब्रे) अशी खून झालेल्या माय लेकाची नावे आहेत. याप्रकरणी जखमी पती दत्ता भोंडवे (वय ३०) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्ता भोंडवे हे शनिवारी त्यांच्या कारमधून त्यांची पत्नी अश्विनी आणि आठ महिन्याचा मुलगा अनुज याला घेऊन चिंचवडी येथील डांगे चौकात त्यांच्या सासरी गेले होते. रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान ते दारुंब्रे येथील त्यांच्या घरी जाण्यास निघाले. रात्री दहाच्या सुमारास हिंजवडीतील जांबे-नेरे मार्गावर त्यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांनी कार बाजूला घेतली. यावेळी त्या ठिकाणी दबा धरुन बसलेल्या काही चोरट्यांनी कारमध्ये असलेल्या अश्विनी आणि त्यांच्या आठ महिन्यांच्या अनुजचे तोंड दाबले यात त्या दोघांचा मृत्यू झाला. तर दत्ता यांच्या मानेवर चाकू ठेवून हल्लेखोरांनी गाडीतील रोख रक्कम ५० हजार रुपये, दोन मोबाईल, अश्विनी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दत्ता यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली. घटनेनंतर दत्ता यांनी भावाला फोन करुन घडलेला प्रकार सांगितला अश्विनी आणि अनुज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. तर दत्ता भोंडवे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या धक्कादयक घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.