निर्भीडसत्ता न्यूज –
महाबळेश्वर जवळील पसरणी घाटात पत्नीने प्रियकराच्या मदतीने लुटमारीचा बनाव करून पतीचा खून घडवून आणला. त्याच घटनेची पुनरावृत्ती हिंजवडीमध्ये झाली असून नव-याने बायको व मुलाचा त्याच पध्दतीने काटा काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी आरोपी नव-याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, त्याच्या आणखी साथीदारांचा शोध सुरू आहे.
अश्विनी भोंडवे (वय २५) व अनुज भोंडवे (वय ८ महिने) असे खून झालेल्या आईचे व मुलाचे नाव आहे. या प्रकरणी दत्ता वसंत भोंडवे (वय ३०, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) या नव-याला पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता हा बायको व मुलासोबत गाडीतून जांबे व नेरे गावच्या मध्ये असलेल्या कोयतेवस्तीजवळून शनिवारी रात्री जात होता. त्यावेळी दत्ता याला उलटी आल्याने गाडी थांबवून तो बाजुला गेला. तेव्हा अनोळखी दोघांनी तिथे गाडीत शिरून आश्विनी याचा गळा दाबून व अनुज याचा मारहाण करून खून केला. हत्याराने दत्ता याच्यावर देखील वार केले होते. त्यामुळे लुटमार करत बायको व मुलाला मारल्याची तक्रार दत्ता याने पोलिसांकडे दिली होती. त्याची कसून चौकशी केली असता दत्ता यानेच लुटमारीचा बनाव करून हा खून केल्याचे पुढे आले आहे. दत्ता याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे.
या घटनेचा थेट संबध महाबळेश्वर जवळील पसरणी घाटात झालेल्या आनंद कांबळे या तरुणाच्या खून प्रकरणाशी जोडला गेला आहे. सुरुवातीला हा खून लुटमारीच्या बहाण्याने झाल्याचे निदर्शनास आले. मात्र पोलिसांच्या तपासात पत्नी दिक्षा व तिचा प्रियकर निखिल मळेकर यांनीच आनंद याचा खून केल्याचे उघडकीस आले. त्याच पध्दतीने दत्ता याने आपली बायको व मुलाचा काटा काढल्याने या महाबळेश्वर खून प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे. हा खून त्या घटनेचा आधार घेवून केला गेल्याची शक्यता असल्याने त्याप्रमाणे पोलिसांचा तपास सुरू आहे.