निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड प्रेमलोक पार्क येथील पोलीस आयुक्तालयासाठी शाळेची इमारत देण्यास विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरुपात विद्यार्थ्यांची दळवीनगर येथील शाळेत व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडसाठी पोलीस आयुक्तालयाची मागणी मार्गी लागत आहे. मात्र, जागेअभावी हा प्रश्न गेली कित्येक दिवस प्रलंबित राहिला. मात्र, सत्ताधा-यांनी आयुक्तालयासाठी चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथील मनपा शाळेची जागा देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे तेथील शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांनी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे स्थलांतर दळवीनगर येथील पालिकेच्या शाळेत नको, अशी मागणी पालकांनी केली आहे. त्यावर एकनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत निश्चिंत राहण्याची सूचना पालकांना केली आहे.
प्रेमलोक पार्क येथील शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांची दळवीनगर येथील शाळेत मनपा शाळेत उत्तम व्यवस्था केली जाईल. पालकांनी गैरसमज करून आयुक्तालयाच्या जागेला विरोध करू नये. शाळेची जागा ही तात्पुरत्या स्वरुपात देणार आहोत. आयुक्तालयासाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध झाल्यानंतर ती इमारत पुन्हा शाळेसाठी खुली होणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकविण्याचे काम दळवीनगर येथील शाळेतून केले जाईल. 15 ऑगस्ट रोजी कसल्याही परिस्थितीत पोलीस आयुक्तालयाचे उद्घाटन आपल्याला करावे लागणार आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
- सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार