निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत करण्यात येणारी वृक्षलागवड व संवर्धनाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी वर्षा मॅरेथॉन आयोजि करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक हिंगे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येते. या स्तुत्य उपक्रमात शहरवासीयांचा सहभाग करून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरूच असते. त्याचाच एक भाग म्हणून शहरात वर्षा मॅरेथॉन आयोजित करता येईल. या माध्यमातून वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या उपक्रमात शहरवासीयांना प्रत्यक्षपणे सहभागी करून घेता येईल.
शहरातील विविध सामाजिक, राजकीय, संस्था आणि संघटना, शाळा, महाविद्यालये, जेष्ठ नागरिक, महिला बचत गट, पर्यावरणमित्र, रोटरी आणि लायन्स क्लब, विविध कंपन्या, आस्थापने, प्रवासी संघटना, डॉक्टर, वकील, सीए, उद्योजक, व्यावसायिक, कामगार आदी सर्व घटकांना या उपक्रमात सहभागी करून घेता येईल. या माध्यमातून वृक्षलागवड आणि संवर्धनाबाबत प्रभावीपणे जनजागृती करणे शक्य होईल.
वर्षा मॅरेथॉन ही नवीन संकल्पना आहे. आरोग्यदायी जीवनासाठी शहरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्याच धर्तीवर ही संकल्पना आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यावर भर देता येईल. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करता येईल. पावसाळ्यात हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविता येईल. म्हणून याला वर्षा मॅरेथॉन असे संबोधणे उचित राहिल. पावसाळा सुरू झालाच आहे. त्यामुळे आपण या बाबींचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.
नगरसेवक तुषार हिंगे