निर्भीडसत्ता न्युज –
महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची निवड झाली आहे. समितीच्या पूर्वीच्या अध्यक्षाची बदली झाल्याने समितीची पूनर्रचना करण्यात आली आहे.
पालिकेतील महिला अधिकारी व कर्मचार्यांची पुरूष अधिकारी व कर्मचार्यांकडून विविध प्रकारे छळ केला जात असल्याचा तक्रारीची संख्या गेल्या दीड वर्षांत वाढली आहे. त्या विषयावर पालिका सर्वसाधारण सभेत सदस्यांनी रोष व्यक्त करीत प्रशासनाच्या विरोधात परखडपणे मते मांडली होती. सुमारे तासभराच्या चर्चेनंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा केला. त्या पार्श्वभूमीवर समितीची पूनर्रचना केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
समितीच्या पूर्वीच्या अध्यक्षा मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर यांची नुकतीच बदली झाली आहे. त्या कारणामुळे शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी शिंदे यांची समिती अध्यक्षपदी निवड केली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. शिंदे या शासन नियुक्तीवरील अधिकारी आहेत. समितीमध्ये सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे, आयुक्त कक्षातील उच्चस्तर लघुलेखिका मेधा साळुंके यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
महिलांच्या लैंगिक छळासंदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयुक्तांच्या स्वाक्षरीने शासनाला पाठविणे. विविध विभागात स्थापन करण्यात आलेल्या अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे महिला अधिकारी किंवा कर्मचार्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींबाबतचा अहवाल समितीपुढे ठेवावा. अहवालातील त्रुटी दूर करून त्रुटीरहित अहवाल घ्यावा. प्रत्येक विभागांतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्याचा नियम आहे. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणार्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यासाठी प्रयत्न करणे.