निर्भीडसत्ता न्यूज –
स्मार्ट सिटी अभियानाला 3 वर्षे पूर्ण झाल्याने औचित्य साधून केंद्र सरकारने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट सिटी’च्या राष्ट्रीय परिषदेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबवित असलेल्या चर्होलीतील गृहप्रकल्पाचा मॉडेलचे सादरीकरण केले गेले. त्या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
देशभरातील 100 स्मार्ट सिटी शहराचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसीय परिषद उत्तर प्रदेशातील लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे झाली. या परिषदेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सहभाग घेतला.
परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने चर्होलीतील गृहप्रकल्पाचे मॉडेल प्रदर्शनात मांडण्यास आले होते. या प्रदर्शनास पंतप्रधान मोदी यांची भेट दिली. त्यांनी या मॉडेलची माहिती घेऊन पिंपरी-चिंचवड शहराचे कौतुक केले.
दरम्यान स्मार्ट सिटी म्हणून निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये गेल्या 3 वर्षात काय कामे झाली आहेत, या शहरांपैकी चांगली कामगिरी कोणाची आहे, याचा आढावा या माध्यमातून घेण्यात आला. तसेच, स्मार्ट सिटीचे भवितव्य या विषयावर चर्चासत्र झाले. परिषदेला केंद्रीय मंत्री, उच्चस्तरीय अधिकारी, स्मार्ट सिटी शहराचे आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, महापौर आदी या वेळी उपस्थित होतेे.