निर्भीड न्यूज –
पिंपरी-चिंचवडमधील लष्कराच्या हद्दीत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या जागांच्या हस्तांतरणाचा प्रलंबित प्रश्न, बोपखेल गावासाठी मुठा नदीवर कायमचा रस्ता उभारणे आणि रेडझोन हद्द कमी करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची रविवारी (दि. १५) पुणे येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी सर्व प्रलंबित प्रश्नांसंदर्भात येत्या ३१ मे रोजी पुण्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे सांगितले. तसेच पिंपरी, डेअरी फार्म येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे एक पिलर लष्कराच्या हद्दीत उभारण्यासाठी तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर रविवारी पुणे येथे आले होते. त्यावेळी आमदार जगताप यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमधील लष्कराच्या हद्दीतून जाणारे विविध रस्ते, बोपखेल गावासाठी मुठा नदीवर कार्यमचा पूल उभारणे आणि रेडझोनची हद्द कमी करण्यासंदर्भात भेटीत चर्चा झाली. आमदार जगताप यांनी विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन संरक्षणमंत्री पर्रीकर यांना दिले. यावेळी पर्रीकर यांनी पिंपरी, डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे एक पिलर लष्कराच्या हद्दीत उभारण्यासाठी तातडीने ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले.
त्यामध्ये म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड हे जलद गतीने विकसित होणारे शहर आहे. महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सतत प्रयत्न केले आहेत. परंतु, आजातागायत हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यांचा विनाकारण नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या प्रलंबित प्रश्नांकडे त्वरित लक्ष देऊन ते सोडविण्यात यावेत.
औंध-रावेत हा बीआरटीएस रस्ता लष्कराच्या हद्दीतून जातो. या रस्त्यांशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी लष्कराच्या संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पिंपरी येथील डेअरी फार्मजवळ रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग लष्कराच्या हद्दीतून जातो. त्यासाठी आवश्यक जमिनीपोटी महापालिकेने दोन कोटी ८७ लाख रुपये लष्कराकडे जमा केले आहेत. मात्र या उड्डाणपुलाच्या रचनेत बदल झाल्याने त्याचे एक पिलर लष्कराच्या हद्दीत येत आहे. या सुधारित रचनेला तातडीने मंजुरी दिल्यास डेअरी फार्म येथे उड्डाणपुल उभारण्याचे काम महापालिकेला सुरू करता येईल.
आळंदी रस्ता ते बोपखेल येथील गणेशनगर हा दहा मीटरचा रस्ता करण्यासाठी रक्कम जमा करूनही त्याला लष्कराने अद्याप परवानगी दिलेली नाही. पिंपळेसौदागर येथील सर्व्हे क्रमांक ११९, १२० आणि १२२ मधून जाणारा १८ मीटर रूंद रस्त्याच्या जागेपोटी महापालिकेने आधीच पावणे दोन कोटी रुपये लष्कराकडे जमा केले आहेत. उर्वरित जागेपोटीही महापालिका रक्कम अदा करण्यात तयार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला तातडीने परवानगी देण्यात यावी. पिंपळेसौदागर येथील कुंजीरवस्ती ते रक्षक चौकापर्यंतचा रस्ता गाव नकाशात समाविष्ट आहे. परंतु, लष्कराने हा रस्ता बंद केल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यावरून लष्कराचे अधिकारी आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून या भागातील नागरिकांना रस्ता उपलब्ध करून द्यावा.
दापोडी येथील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयातून बोपखेलकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बोपखेल ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून द्यावा. देहूरोड दारूगोळा डेपो आणि दिघी येथील दारूगोळा डेपोपासून दोन हजार यार्डापर्यंत रेडझोन घोषित करण्यात आले आहे. रेडझोन जाहीर होण्यापूर्वीपासून आणि नंतर या हद्दीत हजारो बांधकामे झाली आहेत. या नागरिकांच्या डोक्यावर कायम टांगली तलवार आहे. येथील नागरिक विविध मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे मावनतेच्या दृष्टीकोनातून रेडझोनची हद्द कमी करून या प्रश्नावरही कायमचा तोडगा काढण्यात यावा. वरील सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविल्यास शहराचा विकास विनाअडथळा सुलभतेने होण्यास मदत होईल. त्यामुळे हे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.”