निर्भीडसत्ता न्यूज –
माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे देशातील सर्वमान्य नेतृत्व होते. सत्ताधार्यांसह विरोधकांनाशी कशी वागावे आणि बोलावे यांचा राजधर्म त्यांनी पाळला. त्यांचा विचाराचा अंगीकार सर्व सदस्यांनी करावा,असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुतांश नगरसेवकांनी व्यक्त केले. वाजपेयींना श्रद्धांजली वाहून सभा 6 सप्टेंबरला दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव होते. वाजपेयी यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, तामिळनाडूचे नेते करूणानिधी, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी आदींसह विविध मान्यवरांना आणि केरळमध्ये पुरात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव नामदेव ढाके यांनी मांडला.
सभेत वाजपेयींबाबत बोलताना अनेकांनी आपले अनुभव कथन केले. अनेकांनी त्यांच्या कविताचे वाचन केले. उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून स्वत:सह तुषार कामठे, अभिषेक बारणे यांचे एका महिन्याचे मानधन देण्याची घोषणा केली.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनीही वाजपेयींच्या गौरव करून त्याचे पालिका भवनाच्या दर्शनी भागात तैलचित्र लावण्याची सूचना केली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम याचे तैलचित्र सभागृहात लावण्यात यावे. सर्व गटनेत्यांची पालिकेच्या लेखा विभागास पत्र देऊन एका महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांना द्यावे, असे आवाहन केले.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी वाजपेयींचे नाव शहरातील महत्वाच्या दिशादर्शक प्रकल्पास देण्याचा सल्ला दिला. केरळ पूरग्रस्तांना मदतीबाबत गटनेत्यांची बैठक बोलावून निर्णय घेण्याची सूचना केली.
केरळला नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन
पूरग्रस्त केरळ राज्याला सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाला महापौरांनी मंजुरी दिली. या विषयाचा प्रस्ताव सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडला. त्यास सदस्य नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. या विषयांना महापौरांनी मान्यता दिली.