निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्वे स्थानक येथे निर्माण करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे याबाबत जगताप यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी – चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पिंपरी- चिंचवड एमआयडीसी आणि चाकण एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या परिसराच्या नारिकरणाचा वेग जास्त आहे. लोकसंख्या वाढल्याने येथे 15 ऑगस्ट 2018 रोजी पोलिस आयुक्तालय सुरू झाले आहे. त्यामुळेच पुण्याला समांतर शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्याही 22 लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात मोठे रेल्वे स्थानक उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त झाले आहे. असे मोठे रेल्वे स्थानक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ सैन्यदलाच्या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन उपलब्ध होऊ शकते.
पिंपरीत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. शेकडो एकर जागेत हा डेअरीफार्म आहे. मात्र सैन्यदलाने तो फार्म बंद केला आहे. त्यामुळे सध्या ही जागा पडून आहे. त्यामुळे सैन्यदलाकडून ही डेअरीफार्मची जागा रेल्वे मंत्रालयाकडे वर्ग करणे सहज शक्य आहे. कमी कालावधीत ही जागा उपलब्ध होऊ शकते. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातील ही जागा आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग तसेच हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे मार्गही येथून सोयीचे आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून नाशिककडे जाणा-या प्रवाशांना या रेल्वेस्थानकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. अध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीकोनातूनही पिंपरी-चिंचवड शहराला महत्व आहे. चिंचवड येथील महान साधू मोरया गोसावी समधी मंदिर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गाव असलेले तीर्थक्षेत्र देहू, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज अर्थात माउलींचे संजीवन समाधीस्थळ असलेले तीर्थक्षेत्र आळंदी, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर आदी तीर्थक्षेत्रांसाठी पिंपरी मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे पिंपरी रेल्वे स्थानकाचा विस्तार करून या स्थानकालगतच्या सैन्यदलाच्या डेअरीफार्मच्या शेकडो एकर जागेत रेल्वे जंक्शन उभारता येईल. या नवीन रेल्वे जंक्शनमुळे शहरातील लाखो प्रवाशांची सुखकर प्रवासाची सोय होईल. त्यामुळे सैन्यदलाच्या पिंपरीतील डेअरीफार्मच्या जागेवर जंक्शन उभारून मोठ्या रेल्वेस्थानकास मंजुरी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.