निर्भीडसत्ता न्यूज –
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोकराज्य हे मासिक प्रकाशित करण्यात येते. तरुणांनी हे मासिक आवर्जून वाचावे. लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचते. यामुळे लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम असल्याचे प्रतिपादन हिंद तरुण मंडळ ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व नगरसेवक दिलीप गिरमकर यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी संवादपर्व व लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पुणे कॅम्प येथे संवादपर्व व लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, ट्रस्टचे अध्यक्ष संदीप आगुरेड्डी, अमोल भोज, राजाराम सरसवते, राजेश कुऱ्हाडे, सुनिल भट्टम, विलास कसबे, विशाल कार्लेकर, संजय गायकवाड, ज्ञानेश भुकेले, विशाल तामचीकर, मोहन मोटे आदी उपस्थित होते.
गिरमरकर म्हणाले, लोकराज्य वाचक मेळाव्यातून वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी मदत होणार आहे. लोकराज्य या अंकातील प्रत्येक पान वाचनीय आहे. जसा हा अंक स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा आहे तसाच तो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा आहे. शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांची माहिती सोप्या भाषेत या मासिकातून देण्यात येते.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग म्हणाले, लोकराज्य मासिक हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाने विचारांची कक्षा रुंदावते. या मासिकातील प्रत्येक पान आपणास विचारांनी समृद्ध करेल. संवादपर्व या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाते.
लोकराज्य वाचक मेळावा व संवादपर्व या उपक्रमाची संकल्पना तसेच उद्देश याबाबत ज्ञानेश भुकेले यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. अभार माहिती सहायक विलास कसबे यांनी मानले.