मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक रविवारी (23 सप्टेंबर) सकाळपासून नाचत-गाजत सुरुवात झाली आहे. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत.
मुंबईत एकूण १६२ ठिकाणी गणपतींचं विसर्जन करण्यात येईल. मुंबई महापालिकेने ३० हून अधिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून चौपाट्यांवरही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. मुंबई शहरातील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, मार्वे, मनोरी, गोराई, इ. चौपाट्यांवर विसर्जन करण्यात येणार आहे. अशा वेगवेगळ्या चौपाट्यांवर मिळून ५ हजारहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. चौपाट्यांवर मोटारबोटी, सीसीटीव्ही यंत्रणा, सर्चलाइट, लाइफगार्ड, निर्माल्य कलश, प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.