निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्रात प्रथमच तळेगाव येथे देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘एनड्युरो ऑफ रोड कार टेस्टिंग चॅम्पियनशिप’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या स्पर्धेत अंतिम फेरीत अहमदाबाद, गुजरात येथील सिल्वर ओक अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचा ‘एनड्युरो चॅम्पियनशिप’चा किताब पटकाविला. नाशिक येथील के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाने दुसरा क्रमांक आणि मुंबईतील संघवी अभियांत्रिकी महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचा किताब पटकाविला. तसेच पीसीसीओईने कार डिझाईन विभागात प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना आमदार सजंय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते व ऑस्ट्रेलियातील प्रसिध्द कार डिझाईनर ग्लेन हंप्रीज, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, नूतन कॉलेजचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, एनड्युरो कंपनीचे संचालक सौम्या क्रांती भोस, शुभम ठाकूर, समन्वयक संतोष शेळके यांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकी आणि एनसीईआरच्या मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘एनड्युरो ऑफरोड कार टेस्टिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेचे तळेगाव येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि.18 फेब्रुवारी) रात्री बक्षिस वितरण संपन्न झाले. या स्पर्धेत देशभरातून सुमारे दोन हजार अभियंत्यांनी स्वत: बनविलेली इलेक्ट्रिक कार सादर केली.
आयआयटी पटणा, हैद्राबाद, भिलाई आणि एनआयटी त्रिची या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांसह देशभरातील 72 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ही स्पर्धा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादर करण्यासाठी उत्तम संधी असते. कार स्वतः डिजाईन करणे, कार तयार करणे, त्याचे अचुक आर्थिक नियोजन तसेच तयार केलेली कार विविध चाचण्यांमधून सक्षमपणे चालविणे या स्पर्धेतून शिकता येते. अंतिम फेरीत सलग चार तास खडतर ट्रॅकवर न थांबता सर्व संघांनी कार चालविली. सिल्वर ओक संघाने चार तासात चाळिस फे-या पुर्ण केल्या.
एनड्युरो स्टुडन्ट इंडियाच्या या स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. हि स्पर्धा पहिल्यांदाच पुण्यात होत आहे. यापुर्वी दोन वर्षी एनआयटी जमशेदपूर, तिसऱ्या वर्षी फार्म्युला वन स्पर्धेमुळे प्रसिद्ध झालेले बुध्द इंटरनॅशनल- नोएडा, चौथी आणि पाचवी स्पर्धा कोइंबतूर येथे झाल्या आहेत. ऑस्ट्रेलिया येथील ग्लेन हंप्रीज हे सुप्रसिध्द कार डिजाईनर यांनी स्पर्धेस भेट दिली. परीक्षक म्हणून मर्सिडिज, फियाट कंपनीमधील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी यांनी काम पाहिले. मॅग्ना हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. या स्पर्धेत पहिले तीन दिवस तयार केलेल्या कारचे तांत्रिक परीक्षण झाले प्रत्यक्ष चार तासांची एनड्युरो स्पर्धा झाली.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे निर्मिती प्रक्रियेमधील कौशल्य तयार व्हावेत, रेसिंग कारमध्ये या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीचे तंत्रज्ञान वापरले जावे, टीमवर्क आणि साहसीवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या आयोजनात नूतन संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, संस्थेचे विश्वस्त राजेश म्हस्के, रामदास काकडे तसेच पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, नूतन – पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. हरीश तिवारी, डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. जीवन पाटील, प्रा शितलकुमार रवंदळे, प्रा. संतोष शेळके यांनी स्पर्धेच्या नियोजनात सहभाग घेतला .