निर्भीडसत्ता न्यूज |
कामगारांना कामाच्याच ठिकाणी मुक्कामाची अट आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना देऊन पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्याचा महापालिकेने आदेश काढावा, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.
आमदार जगताप व आमदार लांडगे यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त हर्डीकर यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. प्रभाग स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ३२ पथकांमार्फत शहरातील किराणा दुकान, मेडीकल, मिठाई, भाजी विक्री, दुधविक्री, हार्डवेअर दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंग पालनासाठी विशेष लक्ष देण्यात यावे. कम्युनिटी किचनमध्ये काम करणाऱ्यांची तपासणी करुन त्यांना सॅनिटायझर, मास्क, साबणांचा मुबलक पुरवठा करणेत यावा. कोरोना योध्दे, वैद्यकीय पथके, आरोग्य व साफसफाई कर्मचारी तसेच कंटेनमेंट झोनमधील झोपडपट्टीमध्ये होणारी रुग्णांची वाढ लक्षात घेता सर्वांच्याच प्राथमिक तपासणीचा उपक्रम राबविण्यात यावा. कोरोनाची रॅपिड टेस्टची संख्या वाढवावी, अशा सूचना आमदार जगताप व आमदार लांडगे यांनी दिल्या.
पिंपरी-चिंचवडमधून परप्रांतीय मजूर आणि राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी एखाद्या मोठ्या मैदानावर किंवा कार्यालयात व्यवस्था करावी. या तपासणीसाठी खासगी डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात मदत घेण्याचे नियोजन प्रशासनाने करावे. सध्या परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. हे कामगार प्रामुख्याने लघु उद्योगांमध्ये काम करणारे असून, त्यांच्या जाण्याने कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. शहरातील मोठ्या उद्योगांनाही कच्च्या मालाचा पुरवठा कमी होणार आहे. असे चित्र निर्माण होऊ नये यासाठी लघु उद्योगांना ३० टक्के कामगारांना घेऊन त्यांची कारखान्यातच राहण्याची सोय करण्याच्या अटीवर कंटेनमेंट झोन वगळून उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. तसा आदेश महापालिकेने काढावा, अशी सूचनाही आमदार जगताप व आमदार लांडगे यांनी दिली आहे.