पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहून सोमवारची (दि.20) सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली आहे. साने यांचे नाव पालिकेच्या एका प्रकल्पास देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
पालिकेने प्रथमच आज ऑलनाईन सभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलैला कोरोनामुळे चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या दुर्वेवी मृत्यूमुळे सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर तुषार हिंगे, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेचे राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी महापौर राहुल जाधव तसेच, काही नगरसेवकांनी साने तसेच, प्रभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहली.
शहरात कोरोनामुळे महापालिका नगरसेवकांसह माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिकांचा मृत्यू होत आहे. ही शहरासाठी गंभीर बाब आहे, असे मत अनेक पदादिकारी व नगरसेवकांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यांना चांगले उपचार मिळावेत म्हणून राजू मिसाळ यांनी महापौरांना विनंती केली.
नगरसेवक दत्ता साने ही सक्रिय नगरसेवक होते. पालिकेच्या एका प्रकल्पास त्यांचे नाव दिले जावे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी सूचना माजी पक्षनेते एकनाथ पवार व उपमहापौर तुषार हिंगे यांनी सभागृहात मांडली. त्यास पक्षनेते नामदेव ढाके यांनी सहमती दिली. ते म्हणाले की, सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही केली जावी. त्यास महापौरांनी अनुमती दिली.
श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा पुढील महिन्यात 20 तारखेपर्यंत दुपारी पावणेदोनपर्यंत तहकूब करण्यात आल्याचे महापौर ढोरे यांनी जाहिर केले. तसेच, कोरोनाबाधित नगरसेवकांना चांगले उपचार केले जावेत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जावी, असा सूचना महापौरांनी आयुक्तांना केल्या. तसेच, चिंचवडच्या आदित्य बिर्ला रूग्णालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या रूग्णालयावर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले.