- शहरात 219 जण कोरोनातून बरे
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे एकाच दिवशी रविवारी (दि.19) 13 पुरूष व 4 महिला असे एकूण 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात निगडी येथील 21 वर्षीय तरूणाचा ही समावेश आहे. तर, आज एकूण 629 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. तर, कोरोनाबाधित 219 रूग्ण बरे झाले.
दिघी येथील 62 वर्षीय पुरूष, चिखली येथील 63 व 64 वर्षीय 2 पुरूष, निगडी येथील 21 वर्षीय तरूण व 45 वर्षीय प्रौढ पुरूष, पिंपळे गुरव येथील 54 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरूष, चिंचवड येथील 59 वर्षीय महिला, भोसरी येथील 54 वर्षीय महिला, पिंपरी येथील 63 वर्षीय पुरूष, कासारवाडी येथील 57 वर्षीय पुरूष, रूपीनगर येथील 52 वर्षीय पुरूष, चाकण येथील 60 वर्षीय महिला, दौंड येथील 43 वर्षीय पुरूष, तळेगाव दाभाडे येथील 52 वर्षीय पुरूष, खडकी येथील 52 वर्षीय पुरूष आणि शिरपूर येथील 57 वर्षीय पुरूष या 17 जणांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात एकूण 254 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 हजार 298 झाली आहे. वायसीएम, भोसरी, कोविड केअर सेंटर व खासगी रूग्णालयात एकूण 3 हजार 165 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित 219 रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण तब्बल 7 हजार 221 कोरोनाबाधित रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
आज एकूण 2 हजार 960 कोरोना संशयितांच्या घशातील द्रव नुमने तपासणी घेण्यात आले. तर, आज तब्बल 3 हजार 180 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 872 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.