पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीमधील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ठाम आहे. दरम्यान, आज नितीन लांडगे यांच्या जामिन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी समिती पीए पिंगळे यानी 16 नावे उघड केल्याने खळबळ उडाली आहे. निकाल राखून ठेवण्यात आला आहे. आता एसीबीने पहिल्यांदाच १६ सदस्यांकडे चौकशी करणार असल्याने या नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. स्थायी समितीतील भाजपसह उर्वरित पक्षीय नगरसदस्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
वर्क ऑर्डरच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी १ लाख १८ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य कारकुन), विजय शंभुलाल चावरिया, (कारकुन) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे (शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.१९) पहाटे अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
स्थायी समिती सभापतींचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी लाचेची रक्कम ‘ वर १६ जणांना द्यावी लागते’ असे ठेकेदारासमवेत केलेले दूरध्वनीवरील संभाषण ‘एसीबी’ कडे रेकॉर्ड आहे. ते १६ जण म्हणजेच स्थायी समितीचे १६ सदस्य असून त्यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्यात आणि अटक केलेल्या ५ आरोपी यांच्यात काही ‘रॅकेट’ आहे का, याबाबत तपास करायचा आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करणे बाकी असल्याचे एसीबीने गुरुवारी (दि.२६) न्यायालयात सांगितले. यावरुन ‘एसीबी’ स्थायी समितीतील १६ सदस्यांची चौकशी करण्यावर ठाम असल्याचे दिसून येते.
स्थायी समितीत सत्ताधारी भाजपचे अॅड. नितीन लांडगे यांच्यासह सुवर्णा बुर्डे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, रवी लांडगे, संतोष कांबळे, सुरेश भोईर, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न अपक्ष नीता पाडाळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, पौर्णिमा सोनवणे आणि शिवसेनेच्या मीनल यादव यांचा समावेश आहे. ‘एसीबी’ या सदस्यांची चौकशी करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातील भाजपच्या रवी लांडगे यांनी राजीनामा दिला असून ते कोणत्याही सभेला हजर राहीलेले नाहीत.