सिंधुदुर्ग | निर्भीडसत्ता न्यूज
अजित पवार अजून अज्ञान आहेत. त्यांनी आपले खाते सांभाळावे. आपण अजून राष्ट्रवादीकडे वळलेलो नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.
कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज (रविवार) शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदूर्गात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच जुने उल्लेख करत शिवसेना घडवण्यात आपलाही हात असल्याचे म्हटले.
नारायण राणे यांना अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, “अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा…मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही. आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकलं पाहिजे.
माझ्या खात्याला अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. पंतप्रधान योजनांना पंतप्रधान निधी देतात. माझ्याकडे असणाऱ्या योजनांना एकाच वेळी साडे चार लक्ष कोटी निधी दिला होता. त्यातील तीन लक्ष कोटी खर्च झाला, अजून एक कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. याशिवाय वर्षभरात येणाऱ्या मागण्या पाहता अर्थखाते पैसे देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांनी काय टीका केली होती
सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे?. निधी द्यायचं बोललं तर गडकरी साहेबांचं मंत्रालय देऊ शकतं. गडकरी साहेबांनी यापूर्वी निधी दिला आहे. कामं पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे. आता त्याच्या नावात काही बदल झाले आहेत. आता करोनाचं संकट आल्याने सुक्ष्म आणि लघू खूप सारे उद्योग अडचणीत आले आहेत. देशातील छोट्या उद्योगांसाठी एखादा निर्णय घेता येत असावा, असं वाटतं.