पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महात्मा फुले आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी उभ्या केलेल्या पुरोगामी चळवळीला फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून मांडण्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेचा उपक्रम स्तुत्य आहे. हा प्रकल्प नव्या पिढ्यांना सतत मार्गदर्शक व प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी (दि.23) केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मध्ये के.एस.बी. चौक, शाहूनगर येथे राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहू सृष्टीचे भूमिपूजन तसेच, पिंपरी चौकातील महात्मा फुले पुतळा परिसरात फुले सृष्टीचे भुमिपूजन खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, केशव घोळवे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, महापुरुषांचे पुतळे असले पाहिजेत.मात्र त्यांचे जीवन स्मारक निर्माण करायचे असल्यास महापुरुषांचे विचार त्याठिकाणी असणे आवश्यक असते. महापुरुषांनी आयुष्यभर समाजकार्य करुन समाजाला दिशा दिली. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांनी पुरोगामित्वाचा पाया रचला आहे.शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर या महान व्यक्तींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचले पाहिजेत. या महापुरुषांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा होता हे नवोदित पिढीला समजले पाहिजे. त्या अनुषंगाने फुले सृष्टी आणि शाहू सृष्टीच्या माध्यमातून महापालिका करीत असलेले काम कौतुकास्पद आहे. प्रकल्प उभारताना आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले.
महापौर ढोरे म्हणाल्या की, महापुरुषांनी इतिहास घडविल्यामुळे आपण त्यांचे पुतळे उभे करतो. त्यांनी केलेल्या कार्याची नवोदीत पिढीला माहिती व्हावी यासाठी ते प्रेरणादायी ठरतात. या सृष्टीमध्ये म्युरल्सच्या माध्यमातून महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग साकारले जाणार आहेत. ही बाब शहरासाठी भूषण ठरणार आहे. पक्षनेते म्हणाले की, महापालिका सर्व भागात महापुरूषांचे स्मारक व सृष्टी उभारत आहेत. ही बाब शहराच्या वैभव वाढत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक तुषार हिंगे यांनी केले. किरण गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले. नगरसेवक केशव घोळवे यांनी आभार मानले.
शाहू सृष्टीसाठी 7 कोटी 28 लाख खर्च
केएसबी चौकात सुमारे 7 कोटी 28 लाख रुपये खर्च करुन शाहू सृष्टी उभारती जाणार आहे. विविध यामध्ये शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स असणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कुस्ती आखाडा, हत्तींची लढाई, गावांचे म्युरल, शाळेचे म्युरल, तलाव आदी बाबींचा समावेश आहे. सुमारे 16 कोटी 57 लाख रुपये खर्च करुन पिंपरी चौकातील फुले सृष्टीमध्ये महात्मा फुले पुतळ्याशेजारी ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक म्युरल बसविण्यात येणार आहे.