पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पिंपरी चौकातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भीम बांधवांचा जनसागर लोटला होता. परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप झाले होते. जय भीमाचा जयघोषाने परिसर दणादूण गेला होता.
डोक्यावर निळे फेटे व टोपी घातलेले, निळ्या व पांढर्या रंगाचा पेहराव करून आलेले नागरिक विशेषत: महिला व तरूणी लक्ष वेधून घेत होत्या. तसेच, अनेकांनी मानेभोवती निळ्या रंगाची मफलर घातली होती. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसृष्टी परिसरात झुंबड उडाली होती. सकाळी भीमसृष्टीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी पालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. खेळणी, छायाचित्रे, पोस्टर, पुस्तके, खाद्यपदार्थ खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाण्याच्या बाटल्या तसेच, अन्नदान करण्यात आले.शहरात अनेक ठिकाणी वाजगाजत बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. तसेच, बौद्ध विहारात वंदनाचा कार्यक्रम झाले. पिंपरीतील एच. ए. कॉलनी व दापोडी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती.