पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक अधिकार्यांचे विभाग बदलले असून, काही अधिकार्यांवर अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभागाची जबाबदारी उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. क्रीडा विभाग उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे तर, आकाशचिन्ह व परवाना विभाग उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे देण्यात आला आहे.
आरोग्य विभागाची जबाबदारी उपायुक्त चारठाणकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्याकडील समाजविकास विभाग जनसंपर्क विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे देण्यात आला आहे. क्रीडा विभागाची जबाबदारी काढून घेत सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे झोपडपट्टी निर्मुलन पुर्नवसन विभाग दिला आहे. क्रीडा विभाग उपायुक्त जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडील आकाशचिन्ह व परवाना विभाग काढून तो पशूवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे देण्यात आला आहे. देशमुख यांच्याकडे कर संकलन विभागासह अभिलेख कक्ष देण्यात आला आहे.
सहशहर अभियंता श्रीकांत सवणेंकडे पाणीपुरवठा
सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडून बीआरटीएस स्थापत्य विभाग काढून घेऊन त्यांना पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवनियुक्त शहर अभियंता मकरंद निकम यांच्याकडे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, स्मार्ट सिटीतील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रकल्पाची नवी जबाबदारी दिली आहे. नवनियुक्त सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचा कार्यभार काढून घेऊन त्यांना अ, ब, क, ई, फ आणि ग क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाची जबाबदारी दिली आहे.
प्रमोद ओंभासेंकडे प्रकल्प विभाग
बीआरटीएस स्थापत्य विभागासाठी सहशहर अभियंता पद मंजूर आहे. त्याला प्रकल्प विभाग असे नाव देण्यात आले आहे. त्या विभागात नव्याने होणारे विशेष प्रकल्प, बीआरटीएस व इतर प्रकल्पांसह वाहतुक नियोजन, पालिकेच्या शाळा व दवाखान्यांतर्गत असलेले संपूर्ण स्थापत्य काम असणार आहे. तो विभाग कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यांना सहशहर अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंत्यांच्या जबाबदारीत बदल
कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांच्याकडे अ ऐवजी ई क्षेत्रीय कार्यलयाचा स्थापत्य विभागाची जबाबदारी दिली आहे. स्मार्ट सिटीची जबाबदारी असलेले मनोज सेठिया यांच्याकडे ह क्षेत्रीयचा स्थापत्य विभागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आबासाहेब ढवळे यांच्याकडील क क्षेत्रीय स्थापत्य काढून बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग दिला आहे. अनिल शिंदे यांच्याकडून पाणीपुरवठा व ड्रेजेन विभाग काढून घेऊन क क्षेत्रीय स्थापत्य विभाग दिला आहे. किशोर महाजन यांच्याकडील झोनिपु स्थापत्य काढून ड्रेनेज विभाग दिला आहे. बीएसयुपी, ईडब्ल्यूएस, पीएमएवाय विभागाचे शिरीष पोरेडी यांच्याकडील दक्षता व गुणनियंत्रण विभाग काढून घेऊन त्यांना अ क्षेत्रीय स्थापत्य विभाग देण्यात आला आहे. देवन्ना गट्टुवार ई क्षेत्रीय स्थापत्य विभागा काढून घेऊन ग क्षेत्रीय स्थापत्य व पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पाची जबाबदारी दिली आहे. प्रशांत पाटील यांच्याकडे ब क्षेत्रीय स्थापत्यसह स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी दिली आहे.