पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे काही मुजोर अधिकार्यांना पालिका कार्यालयातील केबिन हे स्वत:च्या मालकीचे असल्याचा समज करून घेतला आहे. एक अधिकारी तर, चक्क केबिनला टाळे लावून सुटीवर गेला आहे. या प्रकारावरून आश्चर्य व संताप व्यक्त केला जात असून, त्याची महापालिका वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. शहरवासीयांकडून जमा होणार्या मिळकतकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी, अग्निशामक परवाना आणि इतर वेगवेगळ्या शुल्कातून पालिकेचा गाढा हाकला जातो. त्या रक्कमेतूनच अधिकारी व कर्मचार्यांचे दरमहा वेतन केले जाते. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांचे सेवक असल्याचे शासकीय नियमावलीत स्पष्टपणे नमूद केले आहे.
मात्र, काही मुजोर अधिकार्यांना पालिका ही आपली खासगी मालमत्ता असल्याचा गैरसमज झाला आहे. काही अधिकारी पालिकेचे केबिन व वाहन आपल्या मर्जीप्रमाणे वापरतात. शहराच्या हद्दीबाहेरही वाहन पळविले जाते. कार्यालयीन वेळेनंतर केबिनला संबंधित विभागाच्या कर्मचार्यांकडून टाळे लावले जाते. मात्र, काही अधिकारी केबिनची चावी आपल्याजवळ ठेवत असल्याचे प्रकार समोर आला आहे.
माहिती व जनसंपर्क विभागाचे एक अधिकारी 6 ते 17 ऑक्टोबर असे 12 दिवस सुटीवर आहेत. असे असताना तळमजल्यावरील त्यांच्या केबिनला चक्क टाळे लावले आहे. या घटनेची पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.