पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुक
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहेत. राज्य शासनाने नव्याने दिलेल्या ताज्या आदेशानुसार निवडणुक प्रभागरचनेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, प्रभाग सदस्य संख्या तीन की चारची हे स्पष्ट झालेले नसल्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाच्या आदेशानुसार निवडणुकीची प्रभागरचना ठरविण्याचे अधिकारी महाराष्ट्र निवडणूक आयोगाऐवजी राज्य शासनाकडे आहेत. नजिकच्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्याचा 8 सप्टेंबर 2022 चा अध्यादेश आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार 11 नगरसेवक संख्येत वाढ करण्याचा निर्णय रद्द झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2017 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीप्रमाणे 128 नगरसेवक संख्या कायम राहणार आहे. परिणामी, नवीन 11 नगरसेवकांना संधी मिळणार नाही.
फेबु्रवारी 2017 च्या प्रभागरचनेनुसार 128 नगरसेवक संख्या राज्य शासनाने कायम ठेवली आहे. महापालिकेत नव्याने कोणात्याही गाव किंवा भागांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे निवडणुक सध्या अस्तित्वात असलेल्या चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार या दाव्यास सृष्टी मिळत आहे. प्रभाग किती सदस्यांचा असणार याबाबत स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले नसल्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे.