पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)पक्ष चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या खराळवाडी, पिंपरी येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अकील मुजावर यांनी सांगितले.
मुजावर यांनी सांगितले की, चिंचवडसह कसबा मतदार संघासाठी एमआयएम उमेदवार देणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाझ जलील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. त्या करिता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बूथ बांधणी, मतदार पन्ना प्रमुख, सक्षम प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून पोटनिवडणूक विजयी होण्याचा संकल्प केला आहे.
निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. रिंगणात सक्षम उमेदवार उतरविला जाणार आहे. उमेदवारांची चाचपणी करून पक्ष निर्णय समिती व खा. इम्तियाज जली हे अंतिम निर्णय जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले. बैठकीस फैयाज शेख, दीपक कांबळे, रूहीनाज शेख, अश्विनी लांडगे, धम्मराज साळवे,शाहिद शेख, चांद सय्यद, डॅनियल लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.