पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपायुक्त, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 18 अधिकार्यांचे विभाग अचानक बदलून त्यांना इतर विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आयुक्त सिंह यांनी बदलीचे आदेश गुरूवारी (दि.13) काढले आहेत. उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे भूमि आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण, अतिक्रमण निर्मूलन हे विभाग देण्यात आले आहेत. सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग देण्यात आला आहे. उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांना सहआयुक्तपद म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडील समाज विकास विभाग काढून आपत्ती व्यवस्थापन विभाग सोपविण्यात आला आहे.उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडून उद्यान विभाग काढून सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडे देण्यात आला आहे. इंगळे यांना कामगार कल्याण विभाग सोपविण्यात आला आहे.
आरोग्य विभाग काढून समाज विकास विभाग पुन्हा उपायुक्त अजय चारठाणकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, आरोग्य विभाग सहायक आयुक्त विनोद जळक यांच्याकडे देण्यात आला आहे. उपायुक्त मनोज लोणकर यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभागासह क्रीडा विभाग देण्यात आला आहे.
उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडील एलबीटी विभाग काढून नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडे कर संकलन विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग काढून सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे ह क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे केवळ निवडणूक व जनगणना विभाग ठेवण्यात आला आहे.
सहायक आयुक्त अण्णा बोदडेंकडे क क्षेत्रीय कार्यालयासह झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग देण्यात आला आहे. सहायक आयुक्त उमाकांत गायकवाड यांच्याकडे ड क्षेत्रीय कार्यालयासह एलबीटी विभाग दिला आहे. सहायक आयुक्त राजेश आगळेंकडे ई क्षेत्रीय कार्यालय कायम ठेवण्यात आला आहे. प्रशासन अधिकारी सोनम देशमुखांकडे सामान्य प्रशासन विभागासह स्वच्छ भारत अभियानाची जबाबदारी दिली आहे.
शिक्षण विभाग काढून उपायुक्त संदीप खोत यांना पशुवैद्यकीय विभाग देण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणे अग्निशमन विभागही असणार आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंह यांनी निळकंठ पोमण त्यांची पुन्हा विभागप्रमुखपदाचे अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.