पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी अनुसूचित जमाती वर्गातून पदोन्नती घेतली. मात्र, त्याचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. असे असताना त्यांनी खुल्या वर्गातून उपअभियंता पदावरून कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती मिळविली. ती पदोन्नती रद्द करण्यात आली असून, त्यांची उपअभियंता म्हणून पदावतन करण्यात आले आहे.
पोरेड्डी हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या कनिष्ठ अभियंता पदावर 17 जानेवारी 1991 ला रूजू झाले. मात्र, त्यांना पदोन्नती समितीने 17 डिसेंबर 2007 ला त्यांना खुल्या वर्गातून कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती देण्याची शिफारस केली. समितीने दुरूस्ती आदेश काढत त्यांना अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली. मात्र, पोरेड्डी यांनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र सादर न करता विशेष मागास वर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र 2 जुलै 2008 ला सादर केले.
पदोन्नती समितीच्या 11 फेबु्रवारी 2020 च्या विशेष सभेत पोरेड्डी यांना खुल्या वर्गातून कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती देण्याची शिफारस केल्याने त्यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली.मात्र, अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने राज्य शासनाच्या 21 डिसेंबर 2019 च्या अधिसंख्य पदावर सेवावर्ग करण्याच्या निर्णयानुसार त्याचे पदावतन करण्यात आले आहे. अधिसंख्य पद निर्माण करून उपअभियंता पदावर सेवा वर्ग करण्यात आले आहे, असा आदेश आयुक्त सिंह यांनी काढला आहे.