पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या पेन्शन योजनेस प्रारंभ
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पत्रकार हा नेहमी अग्रभागी असतो. मात्र, त्याला आवश्यक योग्य ते सहाय्य मिळत नाही. कोरोना काळात अग्रभागी राहून अनेक पत्रकारांनी काम केले. अशा पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर प्रमाणे सहाय्याची आवश्यकता आहे. पत्रकारांच्या विविध योजनांसाठी महापालिका आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने 60 वर्षांवरील ज्येष्ठ पत्रकारांसाठी दरमहा 5 हजार रूपयांची पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेची सुरूवात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज पिंपरी येथील महापालिका भवनातील भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी यांना 5 हजारांचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील, पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी, मराठी पत्रकार परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक गोविंद वाकडे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे कार्याध्यक्ष राजू वारभुवन, महिला पत्रकार आघाडीच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष गणेश मोरे, पत्रकार भवन समितीचे निमंत्रण गोपाळ मोटघरे, प्रशिक्षण वर्ग समितीचे निमंत्रक मारुती बाणेवार, महिला उपाध्यक्ष सीता जगताप, पत्रकार संघाचे खजिनदार राम बनसोडे, समन्वयक राकेश पगारे, सहचिटणीस गौरव साळुंखे, अशोक पगारे, पत्रकार हल्ला कृती समितीचे अनिल भालेराव, अविनाश कांबीकर, सदस्य व पत्रकार बांधव उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाने पेन्शन योजनेचा घेतलेला निर्णय अतिशय धाडसी व कौतुकास्पद आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवन लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. पत्रकार संघाला महाविद्यालयासाठी इमारत उपलब्ध करून देण्यात येईल. पकार हाउसिंग सोसायटीसाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांबरोबर चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुढारीचे निवासी संपादक किरण जोशी म्हणाले की, पत्रकार संघाच्या योजना खूप कौतुकास्पद आहेत. या योजना कार्यान्वित व्हाव्यात याकरिता आपण पाठपुरावा करू. लोकमतचे निवासी संपादक हणमंत पाटील म्हणाले की, पत्रकार संघ खूप चांगले काम करत आहे. मी स्वतः जी मदत हवी ती करण्यास तयार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना विभागीय सचिव नाना कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ लवकरच रेड स्वस्तिक सोसायटीसोबत पत्रकारांच्या वैद्यकीय उपचाराबाबतचा करार करत आहे. त्यात शहरातील पत्रकारांना सर्व मोठ्या रूग्णालयात सर्व प्रकाराचे उपचार मोफत मिळणार आहेत. संघाच्या उपक्रमांना आयुक्तांनी सहकार्य करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ म्हणाले की, पत्रकारांना पेन्शन योजनेसह इतर योजनांना महापालिकेचे सहाकार्य आवश्यक आहे. संघाने स्वतंत्र विश्वस्त संस्था निर्माण करून असे उपक्रम कायमस्वरूपी राबवावेत. संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी आभार प्रदर्शन केले.