पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात हवेत प्रदूषण करणार्या नागरिक, बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक व विक्रेत्यांना अशा तब्बल 604 जणांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. आतापर्यंतच्या 13 दिवसांत दंडात्मक कारवाई करीत 53 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांना हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, राज्य शासनाने त्याबाबत मार्गदर्शन सूचना महापालिकांना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी दोन असे एकूण 16 विशेष वायू प्रदूषण देखरेख पथके तैनात करण्यात आली आहेत. पथकात उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व एमएसएम कर्मचारी यांचा समावेश आहे.
उघड्यावर कचरा जाळणे, ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेलच्या स्वयंपाकघरातून वायू प्रदूषण, डिझेल जनरेटरचा वापर करून वायू प्रदूषण, कारखाने व लघुउद्योगात वायू प्रदूषण, खोदकाम व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कापड न लावता आणि पाणी न शिंपडल्याने धूळ निर्माण करणे, राडारोडा व बांधकाम साहित्यांची वाहतूक करताना पाणी न शिंपडणे, रस्ता अस्वच्छ करणे, अवजड वाहनांतून वायू प्रदूषण आदी प्रकाराचे प्रदूषण करणार्या नागरिक, संस्था, कारखाने, बांधकाम व्यावसायिक, विक्रेते, वाहनचालक यांच्यावर पथकाकडून कारवाई केली जात आहे. त्याचे छायाचित्रे घेणे व व्हिडिओ शूटींग केले जात आहे.
बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून बुधवार (दि.8) पासून सुरू करण्यात आली आहे. पथकाडून सोमवार (दि.20) पर्यंत एकूण 13 दिवसांत तब्बल 604 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तब्बल 52 लाख 98 हजार 849 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच, नोटीस देऊनही उपाययोजना न केल्यास काही बांधकामे सील करण्यात आली आहेत.