पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या वतीने गुरूवार (दि.15) ते सोमवार (दि.19) असे पाच दिवस शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वास उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
प्रबोधन पर्वानिमित्त निगडी येथील भक्ती-शक्ती समुह चौक, संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळ, डांगे चौक थेरगाव आणि पिंपरी येथील एच.ए. कॉलनी या चार ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या दिवशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 14 ठिकाणी असलेल्या पुतळ्यांसही महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. महापालिका माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
भक्ती-शक्ती उद्यान येथे गुरूवारी सायंकाळी पाचला आयुक्त सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहाला शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम, रात्री आठला शिवशाहीर यशवंत गोसावी यांचे ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील व्याख्यान आहे. शुक्रवारी (दि.16) सायंकाळी सहाला शिवशाहीर अरविंद घोगरे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम व रात्री आठला व्याख्याते बाजीराव महाराज बांगर यांचे ‘व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांचे’ या विषयावर व्याख्यान आहे. शनिवारी ते सोमवार असे सलग तीन दिवस सायंकाळी सातला तळेगाव दाभाडेच्या शिवसह्याद्री शिवस्पर्श प्रतिष्ठान ग्रुपनिर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 400 कलाकार, घोडे, उंट यांचा समावेश असलेले 3 मजली सेटवरील शिवसह्याद्री हे महानाट्य सादर होणार आहे. तसेच, सलग तीन दिवस दिवसभर प्रद्योत पेंढारकर यांचे 500 हून अधिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. महानाट्य व शस्त्रास्त्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
कमलनयन बजाज शाळेशेजारी शुक्रवार सायंकाळी सातला व्याख्याते प्रविण गायकवाड यांचे छत्रपती शिवाजी महाराज व आजची पिढी या विषयावरील व्याख्यान आहे. शनिवारी (दि. 17) सायंकाळी सातला ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय आवटे यांचे ’असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आहे. रविवारी (दि.18) सायंकाळी सातला महादेव वाघमारे यांचा मिमिक्रीचा कार्यक्रम होणार आहे. सोमवार (दि.19) सायंकाळी सातला व्याख्याते तात्यासाहेब मोरे यांचे ‘प्रेरणा शिवचरित्राची’ या विषयावरील व्याख्यान आहे.
डांगे चौक, थेरगाव येथे शनिवार (दि.17) सायंकाळी सातला शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर यांचा शाहिरीचा कार्यक्रम आहे. रविवारी (दि.18) सायंकाळी साताला अझिज काझी व ओंकार वर्पे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम आहे. सोमवार (दि.19) सायंकाळी सातला व्याख्याते राजेंद्र कांबळे कडूसकर यांचे ‘आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान आहे.पिंपरी येथील एच. ए कॉलनी येथे सोमवारी (दि.19) सकाळी नऊला व्याख्याते प्रशांत देशमुख यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन’ या विषयावर व्याख्यान आहे.