पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
गणेशनगर, थेरगाव येथील बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत धोकादायकरित्या एका बाजूला झुकली होती. त्यामुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून ती धोकादायक इमारत पाडण्यात आली. त्यामुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशनगर येथे तीन मजली इमारत धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार थेरगाव अग्निशमन केंद्रास मिळाली. वर्दी मिळताच स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील बागवाणी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उपअग्निशमन अधिकारी चंद्रशेखर घुले तसेच, थेरगाव व पिंपरी अग्निशमन पथकाचे जवान घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या शेजारी राहणार्या नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त मनोज लोणकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणार्या उपाययोजनांची खातरजमा करून संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना इमारत पाडण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले की, आज दुपारी महापालिकेच्या वतीने सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर धोकादायक इमारत पाडण्यात आली. इमारतीचे बांधकाम सुरू होते. इमारतीच्या आरसीसी डिझाईनमध्ये काही त्रुटी होत्या. योग्यरित्या बांधकाम न केल्यामुळे इमारत एका बाजूला झुकली होती. या इमारतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना व रहिवाशांना धोका निर्माण झाला होता.
शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले की, झुकलेल्या इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सार्वजनिक सुरक्षा विचारात घेऊन महापालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेऊन इमारत पाडण्यात आली. त्या जागेवर बांधकाम करण्यासाठी ग क्षेत्रीय कार्यालयाकडून 3 नोव्हेंबर 2022 ला बांधकाम चालू करण्यासाठी दाखला देण्यात आला होता. याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.