पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ३१ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. २७) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. महापालिकेत प्रथमच भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आली आहे. त्यामुळे भाजपचा पहिला स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, हर्षल ढोरे यांची नावे आघाडीवर आहेत.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्ताधारी बनला आहे. १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपचे आहेत. मार्च महिन्याच्या सुरूवातीला महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर गुरूवारी (दि. २४) महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पाच विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये स्थायी समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचा समावेश आहे. आता या सदस्यांमधून समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची सर्वात आधी निवड होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने स्थायी समिती अध्यक्षांच्या निवडणुकीचे वेळापत्रक महापालिकेला पाठविले आहे. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ३१ मार्च रोजी दुपारी बारा वाजता निवडणूक होत आहे. स्थायी अध्यक्षपदासाठी सोमवारी (दि. २७) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे.
दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आशा शेंडगे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हर्षल ढोरे यांची नावे आघाडीवर आहेत. या तिघांपैकी भाजपचा पहिला स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.