पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २४) रोजगार मेळावा घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील ५४ विविध कंपन्यांमधील ४ हजार १६० जागांसाठी सुमारे दहा हजार बेरोजगारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थिती लावली.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हा रोजगार केंद्राचे सहाय्यक संचालक गंगाधर सांगडे, नगरसेवक तुषार हिंगे, केशव घोळवे, अंबरनाथ कांबळे, नगरसेविका अनुराधा गोरखे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, अण्णा बोदडे, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सहाय्यक समाज विकास अधिकारी सुहास बहादरपुरे आदी उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या बेरोजगारांना मार्गदर्शन केले. कौशल्य प्रशिक्षण हे नोकरी मिळण्याचे सोपे व सुलभ साधन आहे. व्यक्तिमत्व विकास व कौशल्य यांचे मूल्यमापन झाल्यावरच नोकरी मिळते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला त्यांनी बेरोजगारांना दिला.