- चार आरोपींना लोणावळ्यातून अटक
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी कॅम्पमधील कराची चौकात मंगळवारी (दि. २७) रात्री एकावर वार करून खून करण्यात आला. रात्री अकरा वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी एक महिला आणि तिच्या भावासह चौघांना अटक केली आहे.
सागर अरूण थोरात (वय २८, रा. भारतनगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अर्चना जालिंदर निकम (वय २६), प्रेम दिलीप रणदिवे (वय २२), गणेश बाळू रोकडे (वय १९ ) आणि एक अल्पवयीन मुलगा (वय १५, रा. भारतनगर, पिंपरी) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी डिका सागर थोरात (वय २४) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर आणि अर्चना यांच्यात लग्नाआधीपासून अनैतिक संबंध होते. लग्नानंतरदेखील हे संबंध कायम ठेवावेत, अशी सागरची इच्छा होती. त्यावरून अर्चनाचा भाऊ प्रेम याने सागरला मारहाण केली होती. तरीही सागर अर्चनाशी वारंवार संपर्क साधून तिला मानसिक त्रास देत होता. त्यामुळे अर्चना, प्रेम रणदिवे, गणेश रोकडे आणि त्यांचा एक साथीदार यांनी सागरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार पिंपरी कॅम्पमधील कराची चौकात मंगळवारी रात्री सागरच्या तोंडावर धारदार शस्त्राने वार केले. यात सागर गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टराने सांगितले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. खुनाची घटना समजल्यानंतर पिंपरी पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांना खून कोणी केला याची माहिती समजल्यानंतर तातडीने तपासचक्र फिरविण्यात आले. आरोपी लोणावळा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.