भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक दररोज दोन तास जाणार शाळेत
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये सत्ताधारी भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक प्रत्येकी एक पालिका शाळा दत्तक घेणार आहे. शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी सत्ताधारी भाजपकडून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.
एकनाथ पवार म्हणाले, महापालिकेच्या १३० प्राथमिक शाळांमधून जवळपास ४० हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सतत परिणाम होत आहे. शाळेच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळेला सर्व सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी भाजपने या उपक्रमाचे नियोजन केले आहे.
भाजपच्या माध्यमातून एक नगरसेवक एक शाळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, शिक्षकांची कमतरता, सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी
भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या भागातील पालिकेची एक शाळा दत्तक स्वरुपात दिली जाणार आहे.
नगरसेवकाच्या नियंत्रणाखाली पालिकेच्या संबंधीत शाळेचे कामकाज शासकीय नियमानुसार चालणार आहे.
शिक्षकांवर नियंत्रण ठेवून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा, सोयी सुविधा मिळाव्यात आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढून शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
भाजपचे आमदार व खासदार देखील एक एक शाळा दत्तक घेणार आहेत. या शाळांमध्ये दोन इंग्रजी माध्यमाचे शिक्षक स्वत:च्या खर्चातून नगरसेवकांकडून दिले जातील. या उपक्रमात विरोधी पक्षांचे नगरसेवकही सहभागी होऊ शकतील, असे आवाहन एकनाथ पवार यांनी केले आहे.