निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे-लोणावळा तिसरा व चौथा ट्रॅक तयार करण्याच्या कामाचे सर्वेक्षण चार महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया काढण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मध्यरेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा व पुणे विभागाचे क्षेत्रीय प्रबंधक दादाभोये यांच्या उपस्थितीत पुणे येथे रेल्वेबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत ही चर्चा झाली. याबाबत खासदार बारणे म्हणाले की, पुणे-लोणावळा तिस-या ट्रॅक बरोबरच चौथ्या ट्रॅकचा अंतिम सर्वे रिपोर्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. हा रिपोर्ट येत्या फेब्रुवारी 2018 पर्यंत पूर्ण होऊन रेल्वे मंत्रालयाला पाठवला जाईल. त्यानंतर मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची जबाबदारी राज्य शासन व रेल्वे विभागाने घेतली आहे.
लोणावळा स्टेशनचा ‘क’ श्रेणीमध्ये समावेश केला असून प्रवाशांच्या सोयीसाठी लोणावळा स्टेशनवर दोन एक्सलेटर बसवण्यात येणार आहेत. तसेच, पादचारी पूल व भांगरवाडी येथील भूमिगत रस्त्याला रेल्वे विभागाने मंजुरी दिली आहे. लोणावळा नगरपालिका यांच्या माध्यमातून हे काम होणार असून ५० टक्के खर्च नगरपालिका करणार आहे. तळेगावमध्ये एका सबवेसाठी रेल्वे विभागाने १० जून २०१७ रोजी मंजुरी दिली आहे. वडगाव केशवनगर येथे सबवेसाठी पुणे रेल्वे विभागाने १ कोटी ५६ लाखांचा प्रस्ताव सादर केला आहे. चिंचवड, पिंपरी, आकुर्डी स्थानकांवर सुविधा देण्याची कार्यवाही चालू असून इतर स्थानकांवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.