निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्याकडील काही जबाबदा-या प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे आयुक्त हर्डीकरांकडील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
आयुक्त हर्डीकर यांनी त्यांच्या प्रशासन विभागातील सहाय्यक आयुक्तांकडे काही अतिरिक्त अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयुक्तांनी काही अधिका-यांना प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाज सोयीचे होणार आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम आणि नागरी सेवा नियुमानुसार, ब, क आणि ड श्रेणी संवर्गातील दोषारोप पत्रांवर स्वाक्षरी करणे, सादरकर्ता व चौकशी अधिकारी नेमणूक करणे, कर्मचा-यांचा परिविक्षाधीन कालावधी वाढविणे, नियुक्ती किंवा पदोन्नती नियमित करणे, याशिवाय लाड समितीच्या शिफारशीनुसार, वारस नियुक्ती, अनुकंपा तत्वावर वारस नियुक्तीबाबत मंजुरी देऊन आदेश जारी करणे, दर दिवसांनी अशा जारी केलेल्या आदेशांची यादी आयुक्तांच्या अवलोकनार्थ ठेवणे असे प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. त्याबरोबर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी हे अधिकार वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय, नि:पक्षपातीपणे वापरावेत, असे आदेश दिले आहेत.