निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळेसौदागर येथील रोजलँड रेसिडन्सीमध्ये पर्यावरणाला अनुकूल अशी स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा (पीईडीएल) सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे विध्यमान नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
झूमकार या कंपनीने ही स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा पीईडीएल या नावाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत पिंपळेसौदागरमधील रहिवाशांनी जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यानुसार कंपनीमार्फत परिसरात काही सायकली ठेवण्यात येणार आहेत.
सायकलचा वापर करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. अर्ध्या तासासाठी दहा रुपये शुल्क द्यावे लागेल. नागरिकांनी आपल्या परिसरात फिरण्यासाठी सायकलचा वापर केल्यास चांगले आरोग्य, कमी प्रदूषण, वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. या सेवेसाठी पिंपळेसौदागरमधील नागरिकांनी कोकणे चौकातील पीईडीएलच्या स्टेशनला भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.