निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी येत्या पंधरा दिवसात कामकाजात मराठीचा वापर सुरू करा. अन्यथा, मनसे स्टाईलने आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी गुरुवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बँकांमधील मराठीच्या वापरासाठी आंदोलन छेडण्याची भूमिका जाहीर केली. त्याबाबत चिखले यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी मनसचे शहर सचिव राजू सावळे, अंकुश तापकीर, हेमंत डांगे, राजेश अवसरे, रुपेश पाटेकर, संजय यादव, विशाल मानकरी, सुशांत साळवी, अक्षय नाळे, सुरेश सकट, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, रवी लाखपूरकर आदी उपस्थित होते.
सचिन चिखले म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढून सर्व राष्ट्रीयकृत बँकांना ग्राहकांच्या सोयीसाठी प्रादेशिक भाषा वापरण्यास सांगितले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचे आदेश धाब्यावर बसवून या बँका मराठी वापरत नाहीत. त्याचा त्रास शहरातील ग्राहकांना होतो. त्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी आपले सर्व कामकाज मराठीत करावे. बँकांचे विविध प्रकारचे फॉर्म, माहितीपत्रके, सूचना फलक, बँकेच्या नावाचा फलक हा मराठी भाषेत असावा. बँकांच्या कर्मचा-यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा, अशा प्रमुख मागणे मनसेकडून करण्यात आल्या. येत्या पंधरा दिवसात अशा प्रकारचा बदल न झाल्यास मनसेतर्फे आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याचे ते म्हणाले.