निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या वतीने आयोजित माजी महापौर कै. सादबा ऊर्फ आप्पासाहेब काटे महापौर चषक जिल्हास्तर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत स्वप्नील सावंत, स्वाती गाढवे या धावपटूंनी प्रथम क्रमांक मिळवित बाजी मारली.
पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे डीस्ट्रीक्ट अॅथेलेटीक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी-चिंचवड सिटी अॅथेलेटीक असोसिएशनच्या सहकार्याने रविवारी (दि.२६) च-होली ते भोसरी इंद्रायणीनगरपर्यंत ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रिडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसेवक राजेंद्र लांडगे, विलास मडीगेरी, सुवर्णा बुर्डे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुरुष खुला गटात स्वप्नील सावंत, महिलांमध्ये स्वाती गाढवे, १८ वर्षीय मुलांमध्ये विकास पुनिया, १८ वर्षीय मुलींमध्ये पायल आमले, १६ वर्षीय मुलांमध्ये सौरभ अनिल, १६ वर्षीय मुलींमध्ये अनुष्का मोरे, १४ वर्षीय मुलांमध्ये जितेंद्र मोनु, १४ वर्षीय मुलींमध्ये सायली गांजाळे यांनी पटाकवला. स्पर्धेतील विविध गटातील सर्व विजेत्यांना एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांची रोख बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले.