निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात नगरसेवक, पदाधिका-यांकडून विकासकामांना आप्तेष्ट, नातेवाईकांची नावे देण्याची परंपरा आहे. त्यावरून पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी महापालिकेतील पदाधिकारी, अधिका-यांना खडसावले आहे. थोर, महापुरुषांची नावे प्रकल्पांना द्यावीत. घरातील किंवा कोणाचेही नाव देवू नका, असे स्पष्ट करत बापट यांनी त्याबाबत धोरण ठरविण्याच्या सूचना पालिका अधिका-यांना दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी (दि. २७) पिंपरी-चिंचवड महापालिकेत बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी २४ तास पाणीपुरवठा, आक्षणातील मोकळ्या जागा आणि मेट्रो प्रकल्पाबाबत अधिकारी, पदाधिका-यांशी तर्चा केली. महापालिका आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीला महापौर नितीन काळजे, आमदार गौतम चाबुकस्वार, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.