न्यायालयात दावा दाखल करणार ; सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे
निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेने नाशिक फाटा उड्डाणपुलावर 14 कोटी रूपये खर्च करून बांधलेला रॅम्प वाहतुक विभागाची परवानगी न घेतल्याने गेल्या तीन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि सल्लागारांकडून हा खर्च वसुल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे. खर्च वसूल न केल्यास न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी महापालिकेने नाशिक फाटा येथे 100 कोटी रूपये खर्च करून जे. आर. डी. टाटा हा दुमजली उड्डाणपूल बांधला आहे. या उड्डाणपुलावर पिंपळे-गुरव येथून मुंबई-पुणे मार्गावर येण्यासाठी अंदाजे 14 कोटी रूपये खर्च करून रॅम्प बनविला आहे. मात्र, रॅम्प बनविताना वाहतूक विभागाची परवानगी न घेतल्याने गेल्या तीन वर्षापासून हा रॅम्प बंद आहे.
त्यामुळे करदात्या नागरिकांचे 14 कोटी पाण्यात गेले आहेत. महापालिकेचे संबंधित शहर अभियंता राजन पाटील, उपअभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता अनिल राऊत तसेच सल्लागार यांच्याकडून हा खर्च वसूल करावा. अन्यथा, न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.