निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा गणेशन यांनी तीन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाची बचत होणार आहे.
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४२० येथील छत्रपती शाहु महाराज विद्यामंदिराच्या आवारात ५ मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी १३ कोटी ७१ लाख ३२ हजार १९७ रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला स्थायी समितीने २६ डिसेंबरला मंजुरी दिली आहे. इमारत बांधण्याचे काम एस. एस. साठे या ठेकेदाराला देण्यात आले आहे. कामाची मुदत दोन वर्षांची आहे. दरम्यान, या शाळेतील मुला-मुलींच्या स्वच्छतागृहासाठी खासदार रेखा गणेशन यांनी दोन वर्षांपूर्वी २० लाख रूपयांचा निधी दिला होता.
त्याच पार्श्वभूमवीर त्यांच्याकडे नव्या इमारतीसाठी देखील निधी मिळविण्यासाठी नगरसेवक शाम लांडे यांनी आयुक्तांकडे मागणी केली होकी. त्यानुसार पालिकेने पत्र पाठविल्यानंतर खासदार रेखा यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीला पत्र पाठवून खासदार निधीतून ३ कोटी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यांच्याकडून निधी मिळाल्याने पालिकेचे तीन कोटी वाचणार आहे. खासदार रेखा यांचे आभार नगरसेवक लाडे यांनी मानले आहे. तसेच, ही शाळा आकांक्षा फाउंडेशन व थरमॅक्स कंपनीमार्फत ‘सीएसआर’ अंतर्गत चालविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.