निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून भरविण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य शिबीराची शहरातील नागरिकांना सवय झाली आहे. माणूस केंद्रबिंदू मानून त्याचे शरीर निरोगी राहावे यासाठी भरविण्यात येणारे हे शिबीर म्हणजे पुण्याचे काम आहे. समाजाला उपयोगी पडणारा हा चांगला उपक्रम असून भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हे खरे सामाजिक कार्य आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरूवारी (दि. ११) काढले.
राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर, नगरसेविका माई ढोरे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा मुंढे, चंदा लोखंडे, निर्मला कुटे, आशा धायगुडे-शेंडगे, नगरसेवक हर्षल ढोरे, शशिकांत कदम, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे, बाबा त्रिभुवन, भाजपचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, कार्यालयीन सचिव रामकृष्ण राणे, माऊली जगताप, राजेंद्र राजापुरे, मिलिंद कंक, राजू लोखंडे, डॉ. देवीदास शेलार, अमोल जवळकर, अजय दुधभाते, भाऊसाहेब जाधव, हेमंत पाडूळे, संजय परळीकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, सर्वसामान्य माणूस आजकाल डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी जाण्यास टाळाटाळ करतो. आपल्याला झालेल्या आजारावर उपचारासाठी किती खर्च येईल, याची भिती त्याच्या मनात असते. अशा वेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रेरणा, स्फूर्ती आणि मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर मोफत उपचार करण्याच्या उद्देशाने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केले जाणारे महाआरोग्य शिबीर समाजाला उपयोगी पडणारे आहे. आमदार जगताप व भाजपच्या कार्यकर्त्यांचे हे खरे सामाजिक काम आहे. रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा मानली जाते. त्यामुळे हे महाआरोग्य शिबीर म्हणजे पुण्याचे काम आहे. या शिबीराची शहरातील लोकांना आता सवय झाली आहे. त्यामुळे हे शिबीर दरवर्षी भरविण्यात यावे. त्याच्या माध्यमातून शहरातील प्रत्येकाला रुग्णसेवा देण्याचा संकल्प करूयात, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, पिंपरी-चिंचवडनगरही ही औद्योगिक आणि श्रीमंतनगरी म्हणून ओळखली जाते. शहरातील नागरिकांना भौतिक सुविधेसोबतच त्यांचे आरोग्यही निरोगी राहावे यासाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजात वावरत असताना सामर्थ्यवान होण्यासाठी निरोगी असणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येकाला चांगली आरोग्यसेवा देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. विविध आजार झालेल्या नागरिकांना उपचारासाठी मुख्यमंत्री फंडातून वर्षभरात ५ कोटींची मदत त्यांनी दिली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत महाआरोग्य शिबीर भरविण्याची कल्पना पुढे आली. पिंपरी-चिंचवडमध्ये असलेले औंध जिल्हा ऊरो रुग्णालयात राज्यातील अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येत आहे. तेथे प्रत्येक रुग्णाला माफक दरात उपचार देण्याचा आमचा मानस आहे. या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना १५ रुपयांत जेवण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. महापौर नितीन काळजे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी रघुनाथ बाबर यांनी केले व आभार गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी मानले.