निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्यास राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी नकार दिला होता. मात्र, ही गावे समाविष्ट करून घेण्यासाठी महापालिकेने पुन्हा खटाटोप सुरू केला आहे. तसा फेरप्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची तयारी सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगतच्या एकुण १४ गावांचा समावेश करण्याचा विषय होता. त्यामध्ये महापालिकेच्या उत्तरेकडील आळंदी देवाची, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, देहू आणि विठ्ठलनगर या गावांचा, तर पश्चिमेकडील हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात अशा एकूण १४ गावांचा समावेश होता. मात्र, काही गावांनी पालिका हद्दीत समावेशाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे उत्तरेकडील सात गावे वगळून पश्चिमेकडील हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे या सात गावांचा समावेश करण्याच्या प्रस्ताव पिंपरी महापालिका सर्वसाधारण सभेने १० फेब्रुवारी २०१५ रोजी मंजूर केला.
तसा प्रस्ताव ३ जून २०१५ राज्य शासनाला सादर करण्यात आला. मात्र, हा प्रस्ताव शासनाने नामंजूर केला होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापन झाल्यामुळे ही गावे पालिका हद्दीत समावेश करण्याची आवश्यकता नसल्याची धारणा शासनाने नकार देताना मांडली होती. मात्र, हिंजवडी, माण, मारुंजी, सांगवडे, गहुंजे, नेरे आणि जांबे ही सात गावे आणि देहूगावातील विठ्ठलनगरपर्यंतचा भाग पालिकेत समाविष्ट करून घेण्यासाठी पुन्हा खटाटोप सुरू झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी शनिवारी (दि.२०) होणा-या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर ठेवला आहे. पालिका सभेत हा प्रस्ताव मंजूर करून पुन्हा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.