निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे गुरव येथील निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने मंगळवारी (दि.१६) पाडापाडी कारवाई केली. त्यामध्ये एक पाच मजली अनधिकृत इमारतीवर देखील बुलडोझर फिरविण्यात आला.
पिंपळे गुरव सांगवीतील अनधिकृत बांधकामे व निळ्या पुररेषेतील बांधकामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महापालिका बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाने काल या भागातील अवैध बांधकामांची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी या भागातील निळ्या पुररेषेतील बांधकामांवर पाडापाडीची कारवाई करण्यात आली. पिंपळे गुरव मोरया पार्कमधील एका पाच मजली इमारत पाडण्यात आली. तसेच, आणखी तीन मोठी चालू बांधकामे देखील कारवाई करून पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनासह पालिका अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने ही कारावई झाली.