यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अशा बांधकामांना महापालिकेच्या वतीने थकीत मिळकतकरासोबत शास्तीकर भरण्याच्याही नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. मिळकतीवर अवाच्या सव्वा शास्तीकर लादला जात असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. शास्तीकर आणि विविध नोटीस फी यामुळे कराच्या एकूण रकमेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिक धास्तावले आहेत.
एवढी रक्कम भरण्यास नागरिकांकडून असमर्थता दर्शविली जात आहे. परंतु महापालिकेकडून नागरिकांकडे सगळ्या रकमेची सक्ती केली जात आहे. ज्या नागरिकांनी शास्तीकर आणि मिळकत कर भरण्याची असमर्थता दर्शविली आहे अशा नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देखील पाठविल्या आहेत. शास्तीकराचा ठोस निर्णय होणार नाही, तोपर्यंत महापालिकेने शास्तीकर वगळून इतर कर भरून घ्यावे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल आणि आलेल्या करातून महापालिकेच्या उत्पनात वाढ होईल. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना शास्तीकरामध्ये दिलासा द्यावा. शास्तीकर भरल्याशिवाय इतर कराचा भरणा होणार नाही, असे सॉफ्टवेअर महापालिकेने तयार केले आहे. नागरिकांची शास्तीकर भरण्याची तयारी नसल्यामुळे मूळ मिळकतकर जमा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीचे उत्त्पन्न वाढवायचे असेल, तर शास्तीकर सोडून इतर कर भरून घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.